नारायणगाव : बैलगाडा शर्यतीत घाटाचा राजा म्हणून बक्षीस मिळवलेल्या “रामा’ बैलाच्या मालकी हक्कावरून दोन मित्रांमध्ये कोयता, दगड व लाकूड आदि साहित्याचा वापर करून हाणामारीची घटना गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथे झाली. याप्रकरणी परस्पर फिर्यादीवरून सहा जणांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मित्र असलेले बैलगाडा मालक नितीन शिंदे व राहुल ढवळे यांचा बैलगाडा शर्यतीचे बैल खरेदी- विक्रीचा व्यवसाय आहे. तीन वर्षांपूर्वी गुंजाळवाडी (ता. जुन्नर ) येथील बैलगाडा मालक युवराज शिंदे व राहुल ढवळे यांनी औरंगाबाद येथून एक लाख रुपये किमतींला बैल खरेदी केला. त्या नंतर युवराज शिंदे यांना दोन लाख पन्नास हजार रुपये देऊन हा बैल राहुल व नितीन यांनी भागीदारीत खरेदी केला.
त्यांनी बैलाचे “रामा” असे नाव ठेवले. शर्यतीचा राजा म्हणून नावलौकिक मिळालेल्या रामाचा भाव वाढला. प्रत्येक घाटामध्ये “रामाची” बारी पाहून बैलगाडा मालकांकडून बैलाला वीस ते तीस लाख रुपयांची मागणी होत आहे. अनेक बैलगाडा मालक रामाला खरेदी करण्यासाठी बोली लावत आहेत. किंमत वाढल्याने रामाच्या मालकी हक्कावरून नितीन व राहुल यांच्यात दुरावा निर्माण झाला.
एवढेच नाही तर दोघात वाद होऊन वादाचे पुनर्वसन हाणामारीत झाले. बैल खरेदीसाठी मी पैसे दिले आहेत. या मुळे सध्याची किंमत ठरवून रामा बैल माझ्या ताब्यात मिळावा अशी मागणी राहुल याने केली. मात्र रामाचे पालन पोषण करून त्याला शर्यतीसाठी मी तयार केले आहे. असा दावा करून नितीन शिंदे याने रामाला देण्यास नकार दिला. रामाला पाहण्यासाठी राहुल त्याच्या दोन मित्रांसमवेत 22 जून रोजी सायंकाळी सात वाजता गुंजाळवाडी येथील नितीन शिंदे यांच्या गोठ्यावर गेला.
यावरून नितीन शिंदे व राहुल ढवळे यांच्यात वाद झाला.या वेळी राहुल ढवळे व त्याच्या दोन मित्रांनी कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची तक्रार नितीन शिंदे यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली.तर नितीन शिंदे व त्याच्या कुटुंबातील इतर दोन सदस्यांनी लाथा बुक्क्यांनी व दगड डोक्यात टाकून जखमी केल्याची तक्रार राहुल ढवळे यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली, हा प्रकार अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता परंतु अखेर बैलावरून मारामारी झाल्याचे आज उघड झाले आहे.
जखमी राहुल ढवळे हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.परस्पर विरोधी तक्रारीवरून नारायणगाव पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप अटक करण्यात आली नाही.दरम्यान पोलिसांच्या भूमीकेकडे बैलगाडा मालकांचे लक्ष लागले आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार म्हणाले की, याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात परस्परांच्या विरोधात हाणामारीचा गुन्हा दाखल झाला असून बैलाच्या मालकीचा वाद त्यांनी आपसात मिटवावा अन्यथा बैलाला पांजरपोळा येथे पाठवावा लागेल.