रहाटणी : रहाटणीचे नेते व माजी नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते आणि शुभम नखाते युवा मंच यांच्या वतीने गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यासाठी नखाते पेट्रोल पंपाजवळ विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी घरगुती गणरायाच्या विसर्जनासाठी या हौदांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रकांत आण्णा नखाते यांनी केले.
रहाटणी आणि काळेवाडी परिसरातील नागरिकांना आतापर्यंत विसर्जनासाठी गावठाणातील पवना नदी घाटावर जावे लागत होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव नदीतील वाहत्या पाण्यात विसर्जनास प्रशासनाने बंदी घातल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेऊन नखाते वस्ती येथे भव्य विसर्जन हौदांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे रहाटणी-काळेवाडीतील विविध कॉलनी व सोसायट्यांतील रहिवाशांसाठी सुलभ व सुरक्षित सोय उपलब्ध झाली आहे.
या ठिकाणी घरगुती तसेच मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार असून मूर्ती दान कार्यक्रम व निर्माल्य संकलनाचीही स्वतंत्र व्यवस्था आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन पार पाडले जाईल, अशी माहिती युवा नेते शुभम नखाते यांनी दिली.
“गणरायाला निरोप देताना निसर्गाची काळजी घेणे, हाच खरा बाप्पाचा आशीर्वाद आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही आम्ही पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाची सोय केली आहे”.
– चंद्रकांत आण्णा नखाते, माजी नगरसेवक, रहाटणी-काळेवाडी प्रभाग