मुंबई : कैद्याचा कारागृहात अपघातामुळे, वैद्याकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे, कारागृह कर्मचाऱ्यांच्या मारहाणीमुळे किंवा कैद्यांच्या आपापसातील भांडणात मृत्यू झाल्यास आणि संबंधित प्रकरणात प्रशासनाची निष्काळजी चौकशीतून सिद्ध झाल्यास, कैद्याच्या वारसांना पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला.
राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या कैद्याचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्यास त्याच्या वारसांना राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या सूचनेनुसार भरपाई देण्याच्या धोरणास मंजुरी देण्यात आली. कारागृहात कैद्यांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. परभणी येथील कारागृहात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा १५ डिसेंबर २०२४ रोजी मृत्यू झाला होता. हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर कैद्यांच्या कारागृहातील मृत्यूबाबत वारसांना भरपाईसाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे.
धोरणात काय?
तुरुंगवासातील आत्महत्येच्या प्रकरणात कैद्याच्या वारसांना एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. कैद्याचा मृत्यू वार्धक्य, दीर्घ आजार, कारागृहातून पलायन करताना अपघातात, जामिनावर असताना, किंवा उपचार नाकारल्याने झाल्यास कोणतीही भरपाई देण्यात येणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास मात्र शासनाच्या विद्यामान धोरणानुसार भरपाई मिळेल.
भरपाईसाठी निकष
कारागृह अधीक्षकांना प्राथमिक चौकशी, शवविच्छेदन, पंचनामा, वैद्याकीय अहवाल, न्यायालयीन व जिल्हाधिकाऱ्यांचा तपास आदी कागदपत्रांसह अहवाल प्रादेशिक विभाग प्रमुखांकडे सादर करावा लागेल. यानंतर सखोल चौकशी करून अंतिम प्रस्तावअतिरिक्त पोलीस महासंचालक व महानिरीक्षकांकडे सादर केला जाईल. त्यानंतर भरपाई दिली जाईल.



