बोस्टन, वॉशिंग्टन
हार्वर्ड विद्यापीठाने अमेरिकी सरकारच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिल्यानंतर, विद्यापीठाची करसवलत रद्द केली जाईल अशी धमकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिली. जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी असलेल्या हार्वर्डच्या आवारात होणारी निदर्शने दहशतवादाच्या पाठिंब्याने होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या स्वत:च्या मालकीच्या समाजमाध्यमावरून केला.
त्यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाला देण्यात येणारा अनुदान आणि विविध कंत्राटांसाठीचा २.२ अब्ज डॉलरचा निधी थांबवण्याची घोषणा केली. विद्यापीठ आवारात विद्यार्थ्यांच्या सक्रिय चळवळींना आवर घालण्याची ट्रम्प प्रशासनाची मागणी मान्य करणार नाही, अशी भूमिका विद्यापीठाने घेतल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले.
हार्वर्ड विद्यापीठाला शुक्रवारी लिहिलेल्या पत्रात ट्रम्प प्रशासनाने व्यापक स्तरावर सुधारणा सुचवल्या होत्या. मात्र, विद्यापीठातील अध्यापन व अध्ययनावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही असे ‘हार्वर्ड’चे अध्यक्ष अॅलन गार्बर यांनी म्हटले आहे.




