अहिल्यानगर : श्रीरामपूर काँग्रेसमधील स्व. जयंत ससाणे यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्ष संजय फड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांच्यासह काँग्रेसच्या १० माजी नगरसेवकांनी आज, मंगळवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.

या प्रवेशामुळे श्रीरामपुरातील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मानणाऱ्या ससाणे गटाला मोठे भगदाड पडले आहे. जिल्हा बँक संचालक करण ससाणे यांना सुरुवातीपासून साथ देणारे संजय फड यांनी साथ सोडलीच शिवाय त्यांच्याबरोबर श्रीनिवास बिहाणी, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, माजी नगरसेवक भारती कांबळे, दत्तात्रय सानप, शामलिंग शिंदे, आशिष धनवटे, राजू आदिक, कैलास दुबय्या, शशांक रासकर, मनोज लबडे, सोमनाथ गांगड, संदेश उर्फ संजय गांगड, भैरवनाथ सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर फरगडे, पंचायत समितीचे उपसभापती सुनील क्षीरसागर, उंबरगावचे सरपंच विराज भोसले, उपसरपंच शिरसगाव ॲड. युवराज फंड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वैभव लोढा, दत्तात्रय ढालपे, नीलेश बोरावके, सिद्धार्थ फंड आदींनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा भाजप प्रवेश झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचे मानले जातात.

नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल : आमदार ओगले

पक्षप्रवेशावर बोलताना काँग्रेस आमदार हेमंत ओगले म्हणाले, यामुळे फारसा फरक पडत नाही. ते गेल्यामुळे संधीअभावी थांबलेल्यांना संधी मिळेल. पक्षाची नव्याने बांधणी करू. आगामी पालिका निवडणूकही जिंकू. आपण सत्तेपुढे वाकणारे नाहीत. जे गेले ते मनाने गेलेले दिसत नाही. त्यांच्या काही अडचणी असतील, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असेल.