
पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२४चा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. पुण्याच्या अर्चित डोंगरे याने राज्यात पहिला तर देशात तिसरा क्रमांक पटकाविला. उत्तर प्रदेशची शक्ती दुबे हिने देशात पहिला क्रमांक पटकाविला असून राज्यातील ९०पेक्षा जास्त अधिक उमेदवार परीक्षेत यशस्वी ठरले आहेत.
यूपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकाल जाहीर केला. त्यात शक्ती दुबे देशात पहिली, तर हर्षिता गोयलने द्वितीय क्रमांक पटकाविला. यूपीएससीतर्फे नागरी सेवा परीक्षा (पान ४ वर)(पान १ वरून) २०२४मधील लेखी परीक्षा सप्टेंबर २०२४मध्ये, तर मुलाखती जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत घेण्यात आल्या. त्यानंतर शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. नागरी सेवा परीक्षा प्रक्रिया एकूण १ हजार १२९ पदांसाठी राबविण्यात आली.
त्यात भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १८०, भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) ५५, भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) १४७, केंद्रीय सेवा ‘गट अ’च्या ६०५, तर ‘गट ब’च्या १४२ जागांचा समावेश आहे. त्यातील ५० जागा दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव असल्याची माहिती देण्यात आली आहे. जाहीर निकालातील २४१ उमेदवारांची शिफारस तात्पुरती असून, एका उमेदवाराचा निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे यूपीएससीने नमूद केले. शिफारसपात्र १००९ उमेदवारांमध्ये ७२५ पुरुष, तर २८४ महिला उमेदवारांचा समावेश आहे. निकालामध्ये पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये राज्यातील काही उमेदवारांनी जागा मिळवली आहे. त्यात शिवांश जागडे (२६वा), आदिती चौघुले (६३वा), साईचैतन्य जाधव (६८वा), विवेक शिंदे (९३वा), तेजस्वी देशपांडे (९९वा) यांचा पहिल्या १०० जणांमध्ये क्रमांक लागला आहे. शिफारसपात्र ठरलेल्या १००९ उमेदवारांमध्ये राज्यातील ९०हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. गतवर्षी राज्यातील ८७ जणांनी परीक्षेत यश मिळविले होते.
निकालाची वैशिष्ट्ये
● पहिल्या पाच क्रमांकात तीन मुलींचा समावेश
● १००९ पात्र उमेदवारांमध्ये ७२५ मुले, २८४ मुली
● सर्वसाधारण प्रवर्गातील ३३५, आर्थिक दुर्बल गटातील १०९ उमेदवार
● मागास वर्गातील ३१८, अनुसूचित जातींतील १६०, अनुसूचित जमातींतील ८७ जण यशस्वी



