विकास बधे यांच्या वैयक्तिक दानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनादेश सुपूर्द
पुणे दि. २९/१०/२०२५ : रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून यंदाच्या दिवाळी सणामध्ये फटाके, मिठाई, भेटवस्तू आणि अनावश्यक खर्च पूर्णपणे टाळून संपूर्ण निधी अतिवृष्टीग्रस्तांसाठी दान करण्यात आला. यात सामाजिक कार्यकर्ते विकास गंगाधर बधे यांनी स्वतःच्या पुढाकाराने आणि वैयक्तिक योगदानातून पाच लाख रुपये जमा करून हा धनादेश स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द केला. या उदात्त कृतीमुळे अनेक पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत मिळणार आहे.
रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सांगितले, “फटाके, मिठाई, भेटवस्तू आणि अनावश्यक खर्च टाळून ते पैसे पुरग्रस्तांसाठी दान करावेत, असा संकल्प आम्ही घेतला. समाजाला आपणही काहीतरी देणे लागतो, या सद्भावनेतून विकास बधे यांच्या पुढाकाराने पाच लाख रुपये जमा केले.
विकास गंगाधर बधे यांनी म्हटले, मी आणि आमचे कामगार यांनी शेतकरी दुःखात असल्यामुळे दिवाळी साजरी केली नाही, पाच लाख रुपये रक्कम पूरग्रस्तांसाठी दिली. युवकांचे प्रेरणास्थान असलेले मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन हा निधी सुपूर्द करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनादेश स्वीकारताना विकास बधे यांच्या वैयक्तिक दानाचे आणि रुग्ण हक्क परिषदेच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, विकास बधे यांसारख्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातून पाच लाख दिले, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लोकवर्गणीतून मिळणारा पैसा महाराष्ट्राच्या संकटकाळात पिडीत लोकांच्या उपयोगी पडत आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख श्री. रामेश्वर नाईक आणि रुग्ण हक्क परिषदेचे समन्वयक राजाभाऊ कदम यांनी विकास बधे यांच्या या कृतीचे अभिनंदन केले. परिषदेने यापूर्वी पूर, दुष्काळ आणि कोविड काळात मदत कार्य केले. मात्र विकास बधे यांनी यावेळी वैयक्तिक पातळीवर पाच लाखांचे दान देऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेती आणि घरा-दारांचे मोठे नुकसान झाले आहे. विकास बधे यांच्याप्रमाणेच या दानातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला हजारो हातांनी मदत करावी, असे आवाहन रुग्ण हक्क परिषदेने केले. धनादेश सुपूर्द करतांना रुग्ण हक्क परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विकास बधे यांनी आवाहन केले की, “संकटग्रस्तांना मदत करणे हीच खरी सणाची भावना आहे.” त्यांच्या या दातृत्वाने युवकांमध्ये सामाजिक जागृतीचा संदेश अधोरेखित झाला आहे.



