पुणे शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करताना महापालिकेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पालिकेला मिळणारा पाणीसाठा अपुरा पडत आहे. त्यामुळे पालिकेकडून पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले जाते. मात्र, शहरातील तब्बल १५,५०० सोसायट्यांकडून पाण्याची उधळपट्टी सुरू आहे.
शहरात प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणी वापरणे अपेक्षित आहे. मात्र, सोसायट्यांमध्ये प्रति व्यक्ती २०० ते १५०० लिटर पाण्याचा वापर करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये असलेला पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरेल, असा दावा केला जात आहे. परंतु, मे महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पालिकेकडून पाण्याचा पुरवठा करताना काळजी घेतली जात आहे. पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ‘पुणेकरांनो, पाण्याची बचत करा’ अशी म्हणण्याची वेळ पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर आली असून शहरातील मोठ्या सोसायट्यांना पाण्यात बचत करण्याबाबतचे लेखी पत्र दिले जाणार आहे. परंतु, पाणीटंचाई असतानादेखील हे पत्र पाठविण्याचा विसर पाणीपुरवठा विभागाला पडला आहे.
वाढत्या उष्णतेमुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. शहरासह उपनगर भागातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याबाबत तक्रारी करत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात जलवाहिन्यांचे मोठे जाळे असतानादेखील कमीदाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या भागात जलवाहिन्या अपुऱ्या आहेत, त्या भागात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर काही भागात पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. तर, दुसरीकडे शहरात नागरिकांसह मोठ्या सोसायट्यांकडून पिण्याचा पाण्याचा अपव्यय केला जातो. त्यामुळे पाणीबचतीसाठी पालिकेकडून नागरिकांना विनंती केली जाणार आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढल्याने पाण्याची मागणी १० ते १५ टक्के वाढली आहे. अशा स्थितीत महापालिकेस धरणातून मिळणारे पाणी मर्यादित असल्याने पाणीबचतीसाठी पालिकेकडून पत्र पाठवून जनजागृती केली जाणार आहे. शहरात अनेक जुन्या सोसायट्या, तसेच इमारती आहेत, त्यांना पालिकेकडून सोसायटीच्या भूमिगत टाकीमध्ये पाणी दिले जाते. मात्र, या टाक्यांची सोसायट्या वर्षानुवर्षे दुरुस्ती करीत नाहीत. परिणामी, टाक्यांना मोठी गळती असते. यातून पाणी जमिनीत मुरते. तसेच टाकी भरल्यानंतर पाणी ओव्हरफ्लो होऊन वाया जाते. सोसायटी जुनी असल्यास घरांमधील नळांना मोठे लिकेज असते, तसेच पिण्याचेच पाणी स्वच्छतागृहासाठी वापरले जाते. त्यामुळे सोसायटीतील सर्व प्रकारची पाण्याची गळती रोखावी तसेच सोसायटीचे उद्यानासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, असे विनंतीपत्र पालिकेकडून दिले जाणार आहे.
अशा होते पाण्याची नासाडी…
पाणीपुरवठा विभागाकडून समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत १ लाख ६५ हजार पाणीमीटर बसविण्यात आले आहेत. त्यानुसार शहरात १९ हजारांहून अधिक सोसायट्या आहेत. त्यातील सुमारे १५,५०० सोसायट्यांमध्ये पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. सोसायट्यांनी घेतलेले नळ कनेक्शन, तसेच पाण्याच्या टाक्यांमधील पाणीगळती, फ्लश टॅंक लिक असणे, पाईपलाईनमध्ये गळती यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ऐन उन्हाळ्यात गार्डनमध्ये पिण्याचे पाणी वापरणे असे प्रकार केले जात आहेत. यामुळे प्रति व्यक्ती पाण्याचा अधिक वापर होत आहे. आता यावर नियंत्रण आणण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांकडून सोसायट्यांची तपासणी केली जाणार आहे. याबाबतचे आदेश संबंधित अभियंत्यांना देण्यात येणार आहेत.
पालिकेकडून पुरेशा प्रमाणात नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणी वापरणे अपेक्षित आहे. एका सदनिकेकडून दिवसाला ५४० लिटर पाण्याचा वापर होणे अपेक्षित आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक पाणी वापरले जात असल्याचे पाणीमीटरमुळे समोर आले आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपूनच केला पाहिजे. पिण्याच्या पाण्याचा मोठा अपव्यय केला जात आहे. जादा पाणी वापरत असलेल्या सोसायट्यांना तसेच नागरिकांना नोटीस देते. मात्र आता नागरिकांना पत्राद्वारे विनंती केली जाणार आहे. त्यानंतर मात्र नोटीस दिली जाईल.
– नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख, महापालिका.