
Pahalgam Attack : २२ एप्रिल या दिवशी काश्मीरमधल्या पहलगाम मध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी जो गोळीबार केला त्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. यानंतर पाकिस्तानच्या विरोधात सरकारने पाच मोठे निर्णयही घेतले आहेत. पर्यटकांनी सांगितलेले अनुभव आणि थरार दोन्हीही अंगावर काटा आणणारंच ठरलं आहे. एका डोळ्यांत आसू आणि दुसऱ्या डोळ्यांत चिड अशी प्रत्येक भारतीयाची भावना आहे. आपण जाणून घेऊ काय घडामोडी घडल्या?
मंगळवारी दुपारी २२ एप्रिलला काय घडलं?
काश्मीर या ठिकाणी असलेल्या पहलगाममध्ये लोक नेहमीप्रमाणे सुट्टी एंजॉय करत होते. काही जण मधुचंद्रासाठी आले होते. कुणी सुट्टी असल्याने थंड हवेचं ठिकाण काश्मीरला भेट द्यायला आले होते. पहलगामला मिनी स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं. या खास ठिकाणाचा अनुभव पर्यटक घेत होते. दोन ते अडीच्या सुमारास गोळीबाराचा आवाज येऊ लागला. त्यानंतर दहशतवाद्यांनी हल्ला केला. काय होतंय काही कळायच्या आतच एकच हलकल्लोळ माजला. दहशतवाद्यांनी गोळीबार करुन २६ जणांना ठार केलं.
गुलझार अहमद या स्थानिकाने सांगितली घटना
गुलझार अहमद नावाचा स्थानिक म्हणाला “आम्ही इथल्या (पहलगाम) स्टँडजवळ शांतपणे उभे होतो. काही पर्यटक वरच्या बाजूला गेले होते. अचानक आम्ही पाहिलं लोक सैरावैरा धावू लागले, त्या पाठोपाठ किंकाळ्या आणि आरडाओरडा ऐकू आला. तेव्हा हे स्पष्टच झालं की काहीतरी भयंकर घडतं आहे. नंतर काही क्षणात समजलं की हल्लेखोरांनी पर्यटकांवर गोळीबार सुरु केला आहे. त्यामुळे पर्यटक घाबरले, त्यांचा गोंधळही वाढला तो क्षण मी कधीच विसरु शकत नाही.”

हल्ला नेमका कुणी केला?
४ दहशतवादी होते, जे तुमचा धर्म कुठला? अशी विचारणा करुन गोळ्या झाडत होते. एका पर्यटक महिलेने ही माहिती दिली की चार जण आमची नावं विचारत होते आणि विचारत होते की तुम्ही हिंदू आहात का? त्यानंतर ते पुरुषांवर गोळ्या झाडत होते. महिला आणि लहान मुलांना त्यांनी काही केलं नाही. जे काही घडलं ते इतकं अचानक घडलं की कुणाला कसलाही विचार करायला वेळ मिळाला नाही. माझ्या नवऱ्याला त्यांनी पाँईंट ब्लँक रेंजवरुन गोळी झाडली आणि ठार केलं. असं एका महिलेने रडत रडत सांगितलं.
हिंदू आहात का विचारुन गोळीबार
या हल्ल्यात जे पर्यटक अडकले होते त्यांनी सांगितलं की जेव्हा चारही दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला तेव्हा तिथे असलेल्या लोकांना ते धर्म विचारत होते. तुम्ही हिंदू आहात का? हा त्यांचा प्रश्न होता. तसंच आमच्या पैकी काही लोकांना त्यांनी कलमा पठण करण्यास सांगितलं असंही हल्ल्यातून वाचलेल्या एका महिलेने सांगितलं. ज्यांना कलमा पठण करता आलं नाही किंवा ज्यांनी नकार दिला अशांवर त्यांनी गोळ्या झाडल्या.