पिंपरी–चिंचवड : पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला निर्णायक डाव टाकत नाना काटे यांना शहर निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून नियुक्त केल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीने काढलेला हा ‘हुकमी एक्का’ भाजपच्या गणितात सरळ धडाका बसवणारा मानला जात आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीत दमदार लढत देत, विरोधी पक्षातील युवा नेतृत्व म्हणून स्वतःचा ठसा उमटवणारे नाना काटे हे युवकांच्या पसंतीचे चेहरे म्हणून आधीच गाजत होते. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे राष्ट्रवादीचा प्रचार इंजिन वेग घेताना दिसणार हे निश्चितच.
दरम्यान भाजपने प्रचार प्रमुख म्हणून आमदार शंकर जगताप यांची घोषणा करताच, राष्ट्रवादी कोणता ‘मोठा चेहरा’ पुढे करते याची शहरभर चुरस निर्माण झाली होती. अशातच नव्या कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने नाना काटे यांच्याबाबत चर्चा आणि अफवांना उधाण आले होते. समर्थकांमध्येही नाराजीची कुजबूज होती.
मात्र, राष्ट्रवादीने अचानक सगळे समीकरण पालटत काटे यांना पुन्हा फ्रंटलाइनमध्ये ढकलले आणि हीच चाल सध्या राजकीय वर्तुळात ‘गेम चेंजर’ म्हणून चर्चेत आहे. भाजपा नेतृत्वापुढे तोडीस तोड उभे राहील, अशी प्रतिमा असलेल्या काटेंची निवड ही राष्ट्रवादीकडून मोठी खेळी आखली असल्याचे पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वर्तुळात सांगितले जाते.
नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहीने देण्यात आले असून, अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटे यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे राष्ट्रवादी आगामी निवडणुकीत आक्रमक मोडमध्ये असल्याचे स्पष्ट होते.
पिंपरी–चिंचवड महापालिका ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने खेळलेला हा डाव शहरातील राजकीय रणकंदन अधिकच तीव्र करणार आहे.एकूणच, नाना काटे मैदानात उतरल्याने निवडणूक रंग, तापमान आणि समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.




