तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद नूतन वास्तू लोकार्पण सोहळ्यात एकाच व्यासपीठावर आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे यांची अनपेक्षित उपस्थिती राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगवून गेली. दोन परस्परविरोधी विचारधारांची ही मामा भाचे यांची जोडी पाहून मावळच्या कानाकोपऱ्यात एकच चर्चा रंगली की “मावळात काय चाललंय?”….
याच कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी, “आम्ही मनात आणले तर नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद बिनविरोध करू,” असा अप्रत्यक्ष संदेश दिला आणि तालुक्यातील राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याचा संदेश दिला.
सत्ता समीकरणांमध्ये नवा ट्विस्ट
मावळ तालुक्यातील राजकारण हे गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात रंगतदार बनले आहे. विधानसभा निवडणुकीत “नेता विरुद्ध जनता” असे समीकरण निर्माण करून आमदार सुनील शेळके यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. त्यामुळे अनेक नवीन युवा नेतृत्वांसाठी राजकारणाची दारे खुली झाली. दुसरीकडे, अजित पवार गटातील काही पदाधिकाऱ्यांनी विचारधारा सोडून विधानसभेला विरोध करणारी अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हेच लोक आता आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी सज्ज आहेत. त्यामुळे भाजपच्या विचाराशी एकनिष्ठ राहणाऱ्या अनेक इच्छुकांच्या उमेदवारी वरती टांगती तलवार असणार आहे. नव्याने पक्षात आलेल्या पदाधिकारी यांमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत नवीन ट्विस्ट येणार आहे.
भाजपचे बालेकिल्ले की नव्या नेतृत्वाचा संधी?
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र येणारी निवडणूक पूर्णपणे वेगळ्या पार्श्वभूमीवर होत आहे. पहिल्यांदाच आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव नगरपरिषद निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे विधानसभा पाठोपाठ होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. सलग दुसऱ्यांदा विजयी झालेल्या आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली नव्या युवा नेतृत्वाला संधी मिळणार आहे.
तर मावळात विरोधकांचे अंतर्गत गटतट आहेतं यात थरार आणणारी गोष्ट म्हणजे आमदार सुनील शेळके यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जाहीर केला आणि भाजप मात्र शांत आहे! हातावर हात ठेवून भाजप प्रतीक्षा करत आहे का? की गुप्त रणनीती आखत आहे? याचे कोडे उलगडत नाही.
नागरिकांचा संभ्रम….
मावळचे आजी-माजी आमदार जनतेला पटवतात आहेत की पदाधिकाऱ्यांना मामा बनवतात आहेत? एका बाजूने युतीचे संकेत देत हातात हात, तर दुसऱ्या बाजूला उमेदवार जाहीर करण्याची घाई तर जनतेला काय सांगायचे आणि पदाधिकाऱ्यांना काय दाखवायचे, यामधील धूसर राजकारण तळेगावमध्ये अधिक गोंधळ निर्माण करत आहे.
तळेगावमध्ये पुढील काही दिवस धगधगणार,ही निवडणूक फक्त नगरपरिषदेची नाही, ही आजी माजी आमदार आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या प्रतिष्ठेची लढाई आहे, नेताओंची आणि जनतेच्या विश्वासाची. आता पहायचं एवढंच की नगराध्यक्ष सह नगरसेवक बिनविरोध निवडणूक हा आत्मविश्वास आहे की राजकीय डाव? हे लवकरच स्पष्ट होईल.




