प्रभाग १६ रावेत, मामुर्डी, किवळे
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मधील मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत आणि वाल्हेकरवाडी परिसरात प्रचाराला वेग आला आहे. या प्रभागातील वाल्मिकी समाजाने भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण पॅनलला जाहीर पाठिंबा दिल्याने भाजप उमेदवारांचे मनोबल वाढले आहे.
या अनुषंगाने भाजपचे उमेदवार दीपक मधुकर भोंडवे, धर्मपाल तंतरपाळे, शिल्पा मोहन राऊत आणि संगीता राजेंद्र भोंडवे यांनी विविध सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांची भेट घेतली. यावेळी स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच वाहतूक यासह अनेक विषयांवर नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी उमेदवारांचे विचार ऐकून घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अनेक ठिकाणी नागरिकांनी विकासाच्या मुद्यांवर भाजपच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत प्रचारासाठी सक्रिय सहभाग दर्शविला. वाल्मिकी समाजाच्या जाहीर पाठिंब्यामुळे प्रभाग १६ मध्ये भाजपच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे. एकूणच या प्रभागात भाजपच्या संपूर्ण पॅनलला वाढता पाठिंबा मिळत असून, निवडणुकीत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.




