पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) चिखली प्रभाग क्रमांक १ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विकास साने यांनी त्यांच्या निवडणूक अर्जात गुन्हेगारी माहिती लपविल्याचा भाजपाचे उमेदवार सुरेश म्हेत्रे यांनी केलेला आरोप पूर्णपणे निराधार व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही माहिती लपविलेली नसून, सर्व तपशील कायद्यानुसार व सत्य स्वरूपात सादर करण्यात आल्याचा दावा साने यांनी केला.
विकास साने यांनी सांगितले की, निवडणूक अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार आवश्यक असलेली संपूर्ण माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली आहे. “माझ्यावर असलेले सर्व प्रकरणे ही खोटी व राजकीय आकसातून दाखल केलेली असून, त्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. कायद्याने दोष सिद्ध न झालेल्या बाबींचा विपर्यास करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे,” असे साने यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी विरोधक वैयक्तिक आरोपांची पातळी गाठत आहेत. चिखली परिसराच्या विकासासाठी मी केलेले काम जनतेसमोर आहे. मतदार सुज्ञ असून, ते अशा आरोपांना बळी पडणार नाहीत,” असा विश्वास साने यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोग, न्यायालय व कायदा यंत्रणेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे नमूद करत, आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
“माझ्या निवडणूक अर्जात कोणतीही माहिती लपवलेली नाही. सर्व तपशील कायद्याच्या चौकटीत दिले आहेत. विरोधकांकडून सुरू असलेले आरोप हे निव्वळ राजकीय दबाव तंत्र असून, जनतेचे लक्ष विकासकामांपासून विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे.” संपूर्ण चिखली भागाला विकास साने गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे का नाही माहिती आहे.
— विकास साने, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रभाग क्रमांक १, चिखली




