ताथवडे, ११ डिसेंबर २०२६
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २५ मध्ये राजकीय लढत चुरशीची होत असून या प्रभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार चेतन पवार आणि सागर ओव्हाळ यांना महापालिकेत पाठवा, असे आवाहन शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आमदार भास्कर जाधव यांनी ताथवडे येथील प्राचार जाहीर सभेत केले. या सभेला शिवसेना नेते सचिन अहिर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रभागात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये थेट सामना होत असला, तरी घराणेशाहीची उमेदवारी आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळलेल्या नागरिकांचा नाराज सूर स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. “विरोधी पक्षांच्या कारभाराला जनता वैतागली आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर भिडणारे, प्रामाणिक आणि लढाऊ शिवसेनेचे प्रतिनिधी निवडून द्यावेत,” असे जाधव म्हणाले.
दरम्यान, सचिन अहिर यांनीही शहराच्या विकासासाठी लोकशाही जिवंत ठेवणारा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख कायम राहिली पाहिजे, असे मत व्यक्त केले. “पिंपरी-चिंचवडमधील चुकीच्या निर्णयांना रोखण्यासाठी, नागरिकांचे प्रश्न ऐकून त्यावर लढण्यासाठी वाघाची डरकाळी महापालिकेत घुमली पाहिजे. यासाठी प्रभाग २५ मधून चेतन पवार आणि सागर ओव्हाळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,” अशी विनंती त्यांनी मतदारांना केली.
या सभेमुळे प्रभाग २५ मधील निवडणूक अधिक तापली असून शिवसेनेची लढत अधिक आक्रमक होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आगामी मतदानात मतदारांचा कल कोणत्या दिशेने झुकतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




