पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक – प्रभाग २५ :
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २५ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होत आहे. पुरुष गटातून या प्रभागात शिवसेनेकडून चेतन पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मयुर कलाटे, तर भाजपकडून राहुल कलाटे निवडणुकीच्या रिंगणात असून मतदारांचे मोठे लक्ष या तीनही उमेदवारांवर केंद्रीत झाले आहे.
प्रारंभी येथे दुरंगी लढत अपेक्षित असताना चेतन पवार यांच्या आक्रमक, योजनाबद्ध आणि जनसंपर्कावर आधारित प्रचारामुळे ही लढत तिरंगी बनली आहे. वाकड परिसरात नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांमुळे निर्माण झालेली नाराजी, तसेच सामान्य जनतेशी त्यांची जोडलेली नाळ यामुळे प्रभाग २५ मधील चर्चेच्या केंद्रस्थानी चेतन पवार झळकत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रचाराच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांनी प्रभागातील प्रत्येक वस्ती, सोसायटी आणि भागात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपरिक औक्षण करत उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. त्यांच्या प्रचारा रॅलीत शेकडो युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक सहभागी होते.
शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात अटीतटीचा सामना सुरू असताना, ‘दोन कलाटे बंधूंची लढत’ या चर्चेपलीकडे जाऊन चेतन पवार हे ‘डार्क हॉर्स’ ठरत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यांच्या सोशल मीडिया मोहिमेतून मांडलेले प्रभाग विकासाचे व्हिजन, तरुणाईला आकर्षित करणारी काम करण्याची शैली आणि स्पष्ट भूमिका यामुळे मतदार त्यांच्या बाजूने झुकत असल्याची चर्चा रंगली आहे.
एकूणच प्रभाग क्रमांक २५ च्या राजकीय वातावरणाचा केंद्रबिंदू चेतन पवार ठरत असून, त्यांच्या मताधिक्याचा थेट परिणाम या प्रभागाच्या निवडणुकीच्या निकालावर होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता अंतिम निकाल कोणाच्या झोळीत जातो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



