प्रभाग क्रमांक १६ (रावेत, किवळे, मामुर्डी)
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक हायव्होल्टेज मानल्या गेलेल्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये सत्ताधारी भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा अक्षरशः चुराडा झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पॅनलने निवडणूक रणांगणात थेट वज्रमूठ आवळत सत्ताधाऱ्यांना चितपट केले असून, या संपूर्ण राजकीय उलथापालथीचे केंद्रबिंदू ठरले आहेत, आक्रमक युवा नेते बापू कातळे….
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमधील सर्व भोंडवे उमेदवारांनी प्रचारासाठी साम, दाम, दंड नीतीचा पुरेपूर वापर केला, मात्र त्यांची ही ताकद रावेत आणि गुरुद्वारा परिसरापुरतीच मर्यादित राहिली. सत्तेच्या अहंकारात अडकलेल्या या पॅनलला किवळे, मामुर्डी, कातळे वस्तीतील जनभावनांचा अंदाजच आला नाही आणि याच ठिकाणी त्यांच्या पराभवाची नांदी झाली.
दुसरीकडे बापू कातळे यांनी निवडणुकीचे संपूर्ण गणित उलथवून टाकले. किवळे, मामुर्डी आणि कातळेवस्तीमध्ये त्यांनी उभी केलेली युवकांची शिस्तबद्ध फळी, महिलांमध्ये खोलवर रुजलेला विश्वास आणि प्रत्यक्ष कामातून मिळवलेला जनसंपर्क या तिन्ही शक्तींची एकसंध वज्रमूठ बांधून त्यांनी संपूर्ण मतदार शिवसेनेच्या पाठीमागे उभे केले.
गेल्या तीन वर्षांपासून बापू कातळे शांतपणे पण ठोस पद्धतीने संघटन उभारत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरखाली त्यांनी उभे केलेले महिला बचत गट, महिला सबलीकरणाचे काम आणि घराघरात निर्माण केलेला विश्वास हेच घटक ऐन निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकवणारे ठरले.
उमेदवारी डावलण्याचा राष्ट्रवादीचा डाव थेट आला अंगाशी
शिवसेनेचे नेते निलेश तरस यांच्यासोबत संपूर्ण पॅनल उभा करत बापू कातळे यांनी महापालिका निवडणुकीच्या मैदानात थेट शड्डू ठोकला. परिणामी, सत्ताधारी पॅनलमधील मातब्बर नेत्यांना धूळ चारत शिवसेनेचे तीन उमेदवार दणदणीत विजयाने सभागृहात पोहोचले.
प्रभाग क्रमांक १६ – निकाल (मतांसह)
🔹 तंतरपाळे धर्मपाल (भाजप) – १४,८६३ मते विजयी
🔸 बाळासाहेब ओव्हाळ (शिवसेना) – १४,१८७ मते पराभूत
🔹 ऐश्वर्या तरस (शिवसेना) – १७,७८२ मते विजयी
🔸 जयश्री भोंडवे (राष्ट्रवादी काँग्रेस) – १२,६६० मते पराभूत
🔹 रेश्मा कातळे (शिवसेना) – २०,०४० मते विजयी
🔸 संगीता भोंडवे (भाजप) – १३,४९३ मते पराभूत
🔹 निलेश तरस (शिवसेना) – १७,६०२ मते विजयी
🔸 मोरेश्वर भोंडवे (राष्ट्रवादी काँग्रेस) – १२,८७८ मते पराभूत
आज संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये एकच चर्चा रंगली आहे, निर्णायक भूमिकेत राहणारे बापू कातळे यांची संयम आणि युवा संघटन याची ताकद आणि “सत्ता, पैसा आणि मातब्बर नेते असूनही भाजप–राष्ट्रवादीचा पराभव झाला, कारण जमिनीवर काम करणाऱ्या युवा शिवसैनिकांनी त्यांना थेट धडा शिकवला.” हा निकाल केवळ विजय नाही, तर इशारा आहे. जनतेला गृहीत धरणाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना डावलणाऱ्यांना प्रभाग १६ ने थेट उत्तर दिले आहे आणि त्या उत्तराचे नाव आहे : बापू कातळे



