पिंपरी : राज्यातील सर्व महानगरपालिकांनी शास्तीकर वगळुन मिळकत कर भरुन घेणेकरीता पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आदेश दिलेले आहेत. त्यानुसार मार्च २०२२ पर्यंत सदरची सवलत देणेत आलेली होती. परंतु नागरीकांना कोरोना परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्यामुळे सर्व मिळकत धारकांना मिळकत कर भरणे शक्य झालेले नाही. त्यामुळे त्यात वाढ मिळावी यासाठी पालकमंत्री अजितदादा पवार आणि आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिकांची अर्थिक स्थिती विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून मिळकतकर वसुली करताना शास्तीकर अथवा दंड आकारणी केली जाणार नाही. मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा ३१ मार्च पर्यंत नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. ती किमान ३ महिने शास्तीकर वगळुन मिळकत कर भरुन घेणेकरीता मुदवाढ देणेत यावी. महानगरपालिकेद्वारे सर्व नागरीकांना शास्तीकराची रक्कम वगळुन मिळकत कर भरण्यास मार्च २०२२ नंतर मुदतवाढ देणेत यावी असे पंकज भालेकर यांनी म्हटले आहे.