पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात उद्योजक जे. आर. डी. टाटा दुमजली उड्डाणपूल ८ वर्षांपूर्वी बांधला आहे. या उड्डाणपुलावर पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथून नाशिक फाटा चौकात उतरण्यासाठी बांधण्यात आलेला लुप अद्याप वाहतुकीस खुला केलेला नाही. तो तत्काळ खुला करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
या लुपसाठी सुमारे १० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांचा अभिप्राय न घेतल्याने तो लुप बांधण्यात आल्याने पोलिसांनी त्याला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे लुप बंद अवस्थेत आहे, असा आरोप वाघेरे यांनी केला आहे.
लुपमुळे पुणे-मुंबई जुन्या मार्गावरील एक्सप्रेस वे वर वाहतुकीस नाहक अडथळा निर्माण होत आहे. दापोडी ते निगडी हा १२.५० किलोमीटर अंतराचा मार्ग (एक्सप्रेस वे) विनासिग्रल वेगात ये-जा करता यावा म्हणून कोट्यवधींचा खर्च करून हा प्रकल्प महापालिकेने राबविला होता. त्याबाबत पालिकेने मोठी प्रसिद्धीही केली होती. मात्र, नाशिक फाटा आणि फुगेवाडी चौकात सिग्रल असल्याने पालिकेचा तो दावा फोल ठरला आहे. त्या मार्गासाठी मोठ्या संख्येने घरे व दुकाने हटविण्यात आली होती.
नाशिक फाटा चौकातील लुप वाहतुकीस खुला करावा. तेथील सिग्नल यंत्रणा काढून मार्ग विनासिग्नल करावा. तसेच, आठ वर्षे लुप चौक वापराअभावी बंद असल्याबद्दल संबंधित दोषी अधिकारी व सल्लागारांवर कारवाई करावी, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.



