पिंपरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी दोन एप्रिल रोजी प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण देऊन महाराष्ट्रातील शांततेचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात तोडफोड ,मारहाण , सार्वजनिक मालमतेचे नुकसान करणे अशा अनेक स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे महाराष्ट्रभर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या पुरंदरेंना वारंवार महत्व प्राप्त करून देऊन पुरंदरेंच उदात्तीकरण करुन जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये असंतोष निर्माण करीत आहेत. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी विशिष्ट समूहाला धार्मिक निष्ठतेच्या जोरावर एकत्रित करून विशिष्ट समूहविरोधात लढण्यासाठी प्रवृत्त करून संप्रदायिकता निर्माण करीत आहेत.
मागील दोन्ही सभांमधून त्यांनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर पने बहुजन समाजत तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने तसेच दंगली घडवून मनुष्यहानी व वित्तहानी आणि हिंसाचार करण्याचा प्रयत्न करून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष व अनेक सामाजिक संघटनांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या सभेला तीव्र विरोध केलेला आहे. त्यामुळे औरंगाबाद येथील सभेस परवानगी दिल्यास राज्यातील वातावरण बिघडून कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्या औरंगाबाद येथील सभेस परवानगी नाकारण्यात यावी.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रभर राज ठाकरे यांचा निषेध करण्यात येत असून औरंगाबाद येथील सभेस संभाजी ब्रिगेड कडून तीव्र विरोध केला जाईल असे निवेदन संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतिश काळे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते यांनी मुख्यमंत्री गृहमंत्री पोलिस महासंचालक औरंगाबाद पोलिस आयुक्त यांना ई-मेल द्वारे दिले आहे.



