वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवार (दि.२६) पासून गाव भेट दौरा सुरू करण्यात येणार आहे. ‘गाव तेथे राष्ट्रवादी, घर तेथे कार्यकर्ता ‘या थीमवर राष्ट्रवादी काँग्रेस संघटनात्मक बांधणीसाठी खेडोपाडी पोहचणार आहे. केवळ संघटनात्मक बाबीवरचा हा गावभेट दौरा नसून गाव पातळीवरील समस्या या भेटीत जाणून घेणार असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी आपल्या दारी या अभियानास मंगळवारी (दि.२६) सकाळी ९ वाजता नाणे मावळतील वाडिवळे येथील संगमेश्वराचे दर्शन घेऊन पहिल्या टप्प्यातील गावभेट दौ-याचा शुभारंभ होणार आहे. या टप्प्यात नाणे मावळातील वाडिवळे, वळक, बुधवडी, सांगिसे, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, उंबरवाडीतील गावांच्या भेटी घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाम फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे.
चला गावच्या समस्या जाणून घेऊ या, विकासाच्या वाटा शोधू ही टॅग लाईन घेऊन राष्ट्रवादी वाडया वस्तीवर पोहचवून पक्षाची ध्येये धोरण सांगणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मावळच्या जनतेने आमदार सुनिल शेळके यांना विक्रमी मताधिक्य देऊन विजयी केले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्या पाठोपाठ निसर्ग, तौक्ते चक्रीवादळ, अवकाळी पावसा सारखी नैसर्गिक संकटे आली. कोरोना महामारी आली होती. यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या दौ-यात सहभागी होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,” उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुनिल शेळके यांनी मागील दोन वर्षात विविध नैसर्गिक आपत्ती येऊनही विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विविध योजना थेट जनतेच्या दारात घेऊन जाण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. गावभेट दौ-यात नागरिकांनी सत्कार सोहळे न करता आपल्या समस्यांची निवेदन द्यावीत.



