वाकड (वार्ताहर) पिंपळे निलख परिसरात पुणे- वाकड व पिंपरी-चिंचवड परिसराच्या सीमेवर तीन एकर क्षेत्रात अधुनिक सुविधा असलेले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान साकारण्यात आले आहे. उद्यानाची निगा न राखल्याने सुसज्ज आणि मनमोहक असणाऱ्या उद्यानाची दुरवस्था होऊ लागली आहे. निसर्ग महत्त्वाचा आहे. झाडे जगली पाहिजेत हा भाव मनात ठेवून पिंपळे निलख परिसरातील सामाजिक कार्यकर्त गणेश कस्पटे, विनायक गायकवाड व नितीन इंगवेल हे रोज दोन टँकर मोफत पाणीपुरवठा करत आहेत. त्यामुळे उद्यानात असलेली झाडे व हिरवळ तग धरून आहेत. परंतु महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील उद्यानाची होणार दुरवस्था थांबवावी, अशी मागणी केली आहे.




महापालिका प्रशासनाच्या उद्यान विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पाण्याअभावी उद्यान सुकून चालले आहे. परंतु बुडत्याला काढीचा आधार या नियमाप्रमाणे परिसरातील सामाजिक कार्यकत्यांकडून दररोज दोन टैंकर पाणीपुरवठा होत असल्याने सध्या उद्यान तग धरून आहेत. या भागात महापालिका प्रशासनाने सुंदर व नवीन संकल्पना असलेले तसेच हटके असे उद्यान उभारले आहे. करोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.
परंतु महापालिकेच्या उद्यान विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली. पाण्याअभावी उद्यानातील हिरवळ सुकून गेली आहे. काही ठिकाणी लॉन जळून गेले आहे. उद्यानाला सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने लाखो रुपये खर्च करून उभारलेले उद्यान आज पाण्याअभावी नष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे पिंपळे निलख परिसरात महापालिका प्रशासन व उद्यान विभागाच्या नियोजनशून्य कारभारावर टीका सुरू आहे.




