पिंपरी : भारतीय जनता पक्षाने मागील पाच वर्षांत नेमके काय केले? साधे रोज पाणी त्यांना देता आले नाही. ज्यांच्या अंगात पाणी नाही ते काय पाणी देणार, अशी टिका करत प्रश्न सोडविण्याची धमक आमच्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शंभर नगरसेवक निवडून द्या, रोज पाणी दिले नाही तर बोला. सगळे प्रश्न सोडवितो. सर्वांगिन विकासासाठी लोकाभिमुख काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत निवडणुकीची रणशिंगे फुकली.
राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर-जिल्हा कार्यकारणीचे पदवाटप व कार्यकत्यांचा मेळावा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले पवना धरण शंभर टक्के भरलेले असताना दिवसाआड पाणी देताना यांना कसे काही वाटत नाही? असा सवाल करून अजित पवार म्हणाले, “ज्या शहरात पाणी व्यवस्थित दिले जाते, त्या शहराचा विकास होतो. आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६७ एमएलडी पाणी मंजूर केले आहे. जादाचे धरून चिखली येथे ३०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी जलशुद्धीकरण करायला सांगितले आहे.




