चिंचवड : राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी दिली आहे. तर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलले आहे. मागील काही काळापासून पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्याने मुंडे समर्थक नाराज आहेत.

यापूर्वी राज्यात सत्तेत असताना भाजपने चिंचवड येथील निष्ठावंत कार्यकर्ते सचिन पटवर्धन यांना लेखा समिती यांचे अध्यक्ष हे राज्यमंत्री पदाचा दर्जाचे दिले होते. तर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्ष पदावर अमित गोरखे यांना संधी दिली होती. त्यानंतर पुन्हा चिंचवड मतदारसंघातील भाजपच्या एका निष्ठावान कार्यकर्ते उमा खापरे यांना भाजपकडून विधान परिषदेची संधी दिली आहे. यामुळे पिंपरीचे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर भाजपला तिसरे आमदार लाभणार आहेत. पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांची नाव चर्चेत असताना भाजपकडून उमा खापरे यांची संधी दिली आहे.
उमा खापरे या भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन वेळा नगरसेविका (1997 आणि 2002) होत्या. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत एकदा विरोधी पक्षनेत्या म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी भाजप पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहिलं. महिला मोर्चा पदाधिकारी, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्षा ते महिला प्रदेशाध्यक्षा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. तीस वर्षांपासून भाजपच्या कट्टर समर्थक आहेत. महिला ओबीसी चेहरा म्हणून संधी दिल्याची चर्चा आहे. तर उमा खापरे याना पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळणार आहे.




