पवनानगर : मावळत तालुक्यातील पवनामावळ भागातील लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दि ०५ जून रोजी सायंकाळी ०५ ते ०६ जून रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्याण मौजे तिकोणा (ता. मावळ) जि.पुणे गावाच्या हद्दीमध्ये मळवंडी ठुले डॅममध्ये कोरडया जागेमधे खूनाचा गुन्हा घडला होता. या मध्ये आरोपी रघुनाथ बबन वाघमारे (वय ३२ वर्षे ) रा.कोथुर्णे ता.मावळ जि . पुणे याने कोणत्यातरी कारणास्तव कोणत्यातरी घातक हत्याराने संतोष मारुती वाघमारे (वय ३५ वर्षे )रा. कोथुर्णे ता.मावळ जि. पुणे याचे तोंडावर मार करून गंभीर जखमा व हनुवटी फॅक्चर करून जीवे ठार मारुन त्याचा खून केला व पळून गेला होता.
त्याचा कोणत्याही प्रकारचा फोटो नसताना व वास्तव्याचा कोणताही ठाव ठिकाणा नसल्या कारणाने व तो फिरस्ता असल्याने आरोपीस अटक करण्याचा पोलीसांपुढे मोठा बाका प्रसंग उभा राहिला होता. पोलीससानी शोध पथके तयार करून बातमीदारामार्फत कौशल्यपुर्वक आरोपीचा शोध घेवून आरोपीची माहिती मिळवून त्यास गुन्हा दाखल झाल्यापासून ६ तासाचे आत ताब्यात घेण्यात लोणावळा ग्रामीण पोलीसांना यश आले.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला भा.द.वि.क. 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची सध्या दि.०९ जुन २०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, लोणावळा उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सह.पोलीस निरीक्षक निलेश माने, सह.पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, सह पोलीस उपनिरीक्षक युवराज बनसोडे, पोलीस हवालदार विजय गाले , शकील शेख, विशाल जांभळे, पोलीस नाईक रफीक शेख , संतोष शेळके, प्रणयकुमार उकिर्डे यांनी केली आहे.



