मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. राज्यात सत्ताबदल होत असूून देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील हे जवळपास निश्चित आहे. अशावेळी काही वर्षााषपासून फडणवीस यांच्याशी जवळीक साधणारे महेेश लांडगे यांच्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या पथ्यावर पडणार आहे. कारण, त्यातून शहराला प्रथमच मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पिंपरी-चिंचवडला किमान राज्यमंत्रीपद मिळेल, असे वाटत असताना मंत्रीमंडळ विस्तारात ते पद मावळला दिले गेले. शहरातील भाजपचे २ मातब्बर आमदार चिंचवडचे लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे हे त्यासाठी प्रबळ दावेदार होते. त्यासाठी त्यांनी जोरदार व्यूहरचनाही केली होती. त्यामुळे आपल्याच आमदाराला मंत्रीपद मिळेल, अशी आशा दोन्ही आमदारांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली होती. या रस्सीखेचातून कोणी नाराज होऊ नये; म्हणून ऐनवेळी मावळचे पक्षाचे निष्ठावंत आमदार बाळा भेगडे यांना भाजपने मंत्री करीत पिंपरी-चिंचवडमधील संभाव्य वाद हुशारीने टाळला होता. मात्र, त्यातून शहराची ही संधी हुकली. शहर मंत्रीपदापासून वंचित राहिले.
२०१९ मध्येही पुन्हा भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. जगताप व लांडगे पुन्हा निवडून आले. त्यामुळे शहराला पुन्हा मंत्रीपद मिळण्याची आशा निर्माण झाली. पण, शेवटच्या क्षणी शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी भाजपऐवजी दोन्ही कॉंग्रेसबरोबर आघाडी केली आणि पिंपरी-चिंचवडला मंत्रीपदाने पुन्हा हुलकावणी दिली.
योगायोगाने अडीच वर्षानंतर ही संधी पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बंडामुळे चालून आली आहे. घरातील दोन्ही आमदारांपैकी आमदार महेश लांडगे हे फडणवीसांच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातील आहेत. त्यातून शहराला प्रथमच मंत्रीपद मिळण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. याचबरोबर भाजपच्या निष्ठावान व नुकत्याच विधान परिषदेवर निवडून गेलेल्या उमा खापरे यांनाही संधी मिळू शकते.
सोशल मीडियावर महेश लांडगे क्रीडा राज्यमंत्री झाले
राज्यात सरकार स्थापन होण्याचे संकेत मिळाल्यानंतर शहरातील महेश लांडगे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावरती त्यांना क्रीडा राज्यमंत्री बनवून टाकले. लांडगे समर्थक नेहमी एक पाऊल पुढे असतात. समर्थकांकडून सोशल मीडियावर आमदार महेश लांडगे राज्यमंत्री झाल्याचे अभिनंदन बॅनर व्हायरल केले आहेत.




