मुंबई : शिवसेनेतून बंडखोरांची हकालपट्टी करण्याचं सत्र सुरुच आहे. सोमवारी संतोष बांगर याची हकालपट्टी केल्यानंतर आता मंगळवारी रवींद्र फाटक यांचीदेखील हकालपट्टी करण्यात आली आहे. रवींद्र फाटक यांच्यासोबत राजेश शहा यांचीही शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता हळूहळू कारवाईचा बडगा उगारताना दिसत आहेत. शिवसेनेतून बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवला जात असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेच्या मुखपत्रातून हकालपट्टीच्या कारवाईबाबतचं वृत्त देण्यात आलं आहे.
पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.




