पिंपरी : राज्यातील सत्तांतरामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत . त्याचा आगामी महापालिका निवडणुकीवर देखील परिणाम होणार आहे . सद्यस्थितीत तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक आयोगाचे कामकाज सुरू आहे . मात्र , ती प्रभागरचना भाजपसाठी सोयीस्कर नसल्यामुळे चार सदस्यीय पद्धतीने निवडणुका होतील असे संकेत भाजप वरिष्ठ नेत्यांनी पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी शहरातील भाजपच्या स्थानिक नेते व पदाधिकारी व माजी नगरसेवक यांच्या शिष्टमंडळाने त्याची भेट घेतली.
मंत्रिमंडळ स्थापनेनंतर त्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे . राज्यात भाजप सत्तेत असताना फेब्रुवारी २०१७ च्या महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभागरचना करण्यात आली होती . याचा भाजपला फायदा झाला . राज्यातील पिंपरी – चिंचवड महापालिकेसह अनेक पालिकांमध्ये भाजपने सत्ता मिळवली . दरम्यान, महाविकास आघाडी सरकारकडून आगामी महापालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय पध्दतीने निवडणूक घेण्याचा निर्णय झाला . त्या प्रमाणे राज्य निवडणूक आयोगामार्फत प्रभागरचना तयार करण्यात आली . आरक्षण सोडत झाली असून , सध्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यावरील हरकतींवर निवडणूक विभाग काम करीत आहे.
दरम्यान , राज्यात सत्तांत्तर होऊन भाजप व शिवसेनेचे एकनाथ शिंदे गट मिळून सरकार स्थापन झाले आहे . या सत्ता स्थापनेनंतर आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनिती बनविण्याचे काम भाजपमार्फत सुरू आहे . आगामी पालिका निवडणूक ही चार सदस्यीय पध्दतीने घेणे भाजपसाठी अधिक सोईस्कर आहे . तसा भाजपचा प्रयत्न आहे . त्याबाबत भाजपच्या पदाधिकार्यांच्या गाठीभेटी, बैठका सत्र सुरू आहेत.
या भेटीत भाजप नेत्यांनी आगामी निवडणुका चार सदस्यीय पध्दतीने होतील असे संकेत दिले आहेत. मंत्रिमंडळ स्थापनेनंतर ठोस निर्णय होतील . ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचनेवरील न्यायाप्रविष्ट बाबींचा विचार होईल. तोपर्यंत ‘ वेट अॅन्ड वॉच’च्या भूमिकेत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .




