पिंपरी – मागील काही दिवस पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील चोवीस तासात मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा ५० टक्के भरले आहे.
पवना धरण परिसरामध्ये गेले आठवडाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरण जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे परिसरातील भातखाचरे, ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात ४९.४८ टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात हळू हळू वाढ होत आहे. गेल्या २४ तासात या परिसरात १४९ मिमी पाऊस झाला आहे.
१ जूनपासून धरण क्षेत्रात १०५२ मिली मीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात १७ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी आजमितीला धरणात ३३.६० टक्के पाणीसाठा होता
पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील भात लावणीला वेग आला आहे.जोरदार पाऊस झाल्यामुळे परिसरातील भातखाचरे, ओढे,नाले दुथडी भरून वाहु लागले मावळच्या पश्चिम पट्ट्यातील भात लावणीला अजुन सुरुवात झाली नसुन पवनानगर परिसरातील भात लावणी शेवटच्या टप्प्यावर आली आहे.




