पिंपरी : शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील एका पंचताराकिंत हॉटेलात आपल्या समर्थक आमदारांच्या आज (ता.१८) घेतलेल्या बैठकीला शिवसेनेच्या लोकसभेतील १९ पैकी १२ खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती लावून त्यांना समर्थन दिले. त्यात पिंपरी चिंचवड येथील मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश होता. त्यामुळे मागील काही दिवसापासून बारणे कोणाचे समर्थन करणार या चर्चांना मूर्त स्वरूप आले आहे.
आजच्या बैठकीला शिवसेनेतून हकालपट्टी केलेले शिरूरचे माजी खासदार आणि शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रत्यक्ष या बैठकीला उपस्थित राहून एकनाथ शिंदेंना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे पुणे जिल्ह्यात दुहेरी कोंडी होऊन शिवसेनेला मोठा सुरुंग लागला आहे.
कालपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘मातोश्री’शी एकनिष्ठ असलेल्या बारणे आणि आढळराव यांनी आज अचानक एकदम यू टर्न घेतल्याने शिवसेनेचा गड राहणाऱ्या शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघात नाही, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, २०२४ ला पुन्हा खासदार होण्यासाठी आपले राजकीय भवितव्य विचारात घेऊन बारणे यांनी शिंदे गटाशी हातमिळवणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, कालच संसदेच्या अधिवेनासाठी ते दिल्लीला गेले आहेत. एरव्ही नेहमी सुरु असलेला त्यांचा मोबाईल फोन आज आतापर्यंत मात्र प्रथमच आश्चर्यकारकरित्या बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी अचानक भूमिका का बदलली हे त्यांच्याकडून कळू शकले नाही.




