पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदी जलपर्णीने युक्त होत्या, त्यांचा श्वास जलपर्णीमुळे गुदमरला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करूनही या नद्यांनी कधीही मोकळा श्वास घेतला नाही. मात्र वरूण राजाच्या कृपेमुळे मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तिन्ही नद्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
गेल्या आठवडाभरापासून वरूनराजा धो-धो बरसत आहे. त्यामुळे नदी पुराच्या पाण्याने ओसंडून वाहत आहे. या पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा जलपर्णी वाहून जाण्यास फायदा झाला आहे. मुळात जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात फोफावते आहे. जवळपास सहा ते सात महिने प्रशासनाकडून जलपर्णी काढण्याचे काम सुरू असते. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असतो. मात्र, पूर्ण नदीपात्र जलपर्णीमुक्त होत नाही. केवळ ठेकेदार व अधिकारी मालामाल होतात.
जलपर्णी ठेकेदारावर भ्रष्टाचाराचे आरोप विरोधी पक्षाकडून केले गेले. मात्र त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. प्रशासनाच्या कामाचा लेखाजोखा जो असेल तो असेल पण निसर्ग मात्र दरवर्षी आपलं काम चोख बजावत असून, यंदाही त्याने पहिल्याच महिन्यात संपूर्ण नदीपात्र पुराच्या पाण्याने जलपर्णीमुक्त केले आहे. त्यामुळे पवना व इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसत आहे.




