काही आठवणी, किस्से, घटना प्रसंग, अशा अनौपचारिक गप्पातून विश्वकोशाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांची प्रेरक वाटचाल सहजपणे उलगडत गेली…
निमित्त होते अक्षरभारती या संस्थेने आयोजित केलेल्या ‘साहित्य संवाद’ या उपक्रमात, प्रा. दीक्षित यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, गझलकार डॉ. अविनाश सांगोलेकर निवृत्त शिक्षण उपसंचालक एम के गोंधळी, परीक्षा परिषदेचे निवृत्त उपायुक्त अनिल गुंजाळ, निवृत्त ग्रंथालय उपसंचालक सु वा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी निवेदक श्रीकांत चौगुले यांनी दीक्षित यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “मी इतिहासात संशोधन कार्य केले असले तरी मला मुळात साहित्याचीही खूप आवड आहे. वडील म. श्री. दीक्षित यांच्यामुळे लहानपणी साहित्याचा संस्कार झाला. मी आधी कवी म्हणून अधिक परिचित होतो. अगदी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कवी संमेलनातही निमंत्रित असायचो. नंतरच्या काळात माझी कागदावरची कविता थांबली, पण माझ्यातील कवी कायम जिवंत आहे. संशोधकीय लेखनातही साहित्यिक अंगाने लिहिता येतो, हे मी अनुभवले आहे.
त्यांनी आपली जडणघडण सांगताना काही किस्से, अनुभव सांगितले. ते म्हणाले, “संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमात झाल्याने सुरुवातीच्या काळात फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन करताना इंग्रजीच्या काही चुका होत. अशा वेळी विशेषतः मुलींना हसू येत असे आणि नुकत्याच एम.ए. झालेल्या माझ्यासारख्या तरुणाला स्वभाविकपणे ते लागत असे ! त्यामुळे मी इंग्रजी सुधारण्याचा ध्यास घेतला. मी गमतीने म्हणतो की फर्ग्युसनच्या सुंदर मुलींमुळे माझं इंग्रजी सुधारलं ! नंतरच्या काळात दिल्लीत ब्रिटिश कौन्सिलच्या वतीने ब्रिटिश विद्यार्थ्यांसमोर इंग्रजीत भाषण केले, इतकी प्रगती झाली !
आयुष्यभर पुस्तके आणि माणसांकडून शिकत गेलो. मला चांगली माणसं भेटली. आईचे संस्कार आणि घरची गरिबी यामुळे अविरत कष्ट करत राहण्याची सवय जडली. अशा सवयीतून १९८६ साली विश्वकोशात नोंदीच्या लेखन-संपादनाची पहिली संधी मिळाली.” …आणि आता त्याच ठिकाणी अध्यक्ष आणि प्रमुख संपादक म्हणून जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांनी धन्यता व्यक्त केली. विश्वकोशाच्या नोंदींसाठी ‘ज्ञानमंडळां’च्या सदोष यंत्रणेवर अवलंबून न राहता विश्वकोश कार्यालयात पूर्वीप्रमाणे स्वतंत्र व्यवस्था केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच विश्वकोशाच्या कारभारात शिस्त आणि गुणवत्तेवर भर देऊन अनेक सुधारणा करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यापीठात प्राध्यापकी करताना शालेय शिक्षणासाठीही अविरत कार्य केले. शैक्षणिक व सामाजिक अशी दुहेरी बांधिलकी बाळगणे आणि आपले पुरोगामी विचार कृतीत उतरवणे, या गोष्टी आयुष्यभर पाळत आलो, हेसुद्धा त्यांनी सोदाहरण सांगितले. मुलाखतीच्या शेवटी त्यांचे काव्यवाचन झाले. ही अनौपचारिक मुलाखत तीन तास रंगली.
या दरम्यान माधव राजगुरू यांच्या ‘प्रतिभा संगम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रमेश बेंद्रे, रत्ना चौधरी, शिरीष पडवळ यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.




