चिंचवड : सेंट अँडरूज या शैक्षणिक संस्थेत एलकेजी ते इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना फक्त मधल्यासुट्टीतच पाणी पिण्यासाठी आणि लघुशंकेला पाठवण्यात येते. इतर वेळी जाऊ दिले जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याबाबत पालक सभेत माहिती देऊन सुध्दा शाळा प्रशासन यावर योग्य मार्ग काढत नाही. त्यामुळे संबधित शाळेला या समस्येवर त्वरीत मार्ग काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात राहुल कोल्हटकर यांनी शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, चिंचवड येथील सेंट अँडरुज या शैक्षणिक संस्थेत एलकेजी ते इयत्ता दहावीपर्यंत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शहरातील नामांकित गणली जाणारी आणि चांगल्या दर्जाचे शैक्षणिक शिक्षण देणारी ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. आपल्या पाल्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून अनेक पालकांनी या शाळेत प्रवेश घेतला. शिक्षणाच्या बाबतीत पालकांची काहीच तक्रार नाही. पण एलकेजी ते इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल आणि शाळेच्या या नियमाबदल पालकांनी जी माहिती दिली त्यानुसार या शाळेत एलकेजी ते इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या लहान वयोगटातील विद्यार्थी यांना फक्त मधल्या सुट्टीतच पाणी पिण्यासाठी आणि लघुशंकेला पाठवण्यात येते.
विद्यार्थ्यांना त्यांची पिण्याच्या पाण्याची बाटली ही वर्गाबाहेर ठेवायला सांगण्यात येते. लहान वयोगटातील मुले असल्याने त्याच्या कडून वर्गात पाणी सांडणे, अस्वच्छता अशा गोष्टी घडू शकतात. म्हणून शाळेने असा नियम केला असेल. पण सदर नियम अयोग्य आहे, असे वाटते. कारण या वर्गात शिकणारी मुले ही लहान वयोगटातील असल्याने त्यांना तहान किंवा लघुशंका लागली तर ते थांबवू शकत नाहीत आणि ते थांबवणे सुध्दा चुकीचे आहे. ही लहान मुले ती थांबवून मधली सुट्टी होण्याची वाट पाहतात. त्यामुळे या गोष्टीचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
शाळेच्या या चुकीच्या पद्धती विरोधात अनेक पालकांनी शाळेच्या पालक सभेत याबाबत माहिती देऊन सुध्दा शाळा प्रशासन यावर योग्य मार्ग काढत नाही. पालकांनी शाळेच्या या चुकीच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने हा विषय महत्वाचा असल्याने संबधित शाळेला या समस्येवर त्वरीत मार्ग काढण्याचे आदेश आपल्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात यावे. तसेच पालक सभेत शाळेच्या या चुकीच्या पद्धतीबाबत पालकांनी वेळोवेळी मागणी करून सुद्धा शाळा व्यवस्थापन समिती यांनी त्या प्रश्नांची दखल घेतली नसल्याने शाळा व शालेय व्यवस्थापन समिती यांच्यावर शिक्षण हक्क कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.




