मुंबई, पिंपरी : राज्यातील शिंदे सरकारने प्रभाग रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतल्याने 23 महानगरपालिकेतील ST, SC, OBC आणि खुल्या प्रवर्गातील आरक्षण राज्य निवडणूक आयोगाने तातडीने रद्द केले आहे. महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना करण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुंरुदकर यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, वसई विरार, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपुर, मालेगांव, पनवेल, मीरा-भायंदर, नांदेड, वडाळा, भिंवडी अशा एकूण 23 महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी तीन प्रभागानूसार आरक्षण सोडत काढण्यात आलेली होती. त्यात SC, ST, OBC आणि सर्वधारण खुल्या प्रवर्गाचे आरक्षण सोडत रद्द करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या सर्व आयुक्तांना दिले आहे. तसेच महापालिकेची प्रभागरचना नव्याने तयार करावी, असेही म्हटले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णयाने समीकरण बदलणार…
महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे सरकारने निश्चित केलेली तीन सदस्यीय प्रभाग पद्धती बदलून, पुणे, पिंपरी-चिंचवडसह सर्व महापालिकांसाठी आता पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुका मागील म्हणजे, २०१७ च्या प्रभागपद्धतीनुसार होणार आहे. त्यासाठी महापालिकांच्या सदस्यांच्या संख्येत सुधारणा करण्याचा महत्त्वाचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.




