राजगुरूनगर (प्रतिनिधी) – पुणे नाशिक रस्त्याचे काम सुरू असल्याने राजगुरुनगर शहरातील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. शनिवारी (दि. 3) शहरात सकाळी साडेदहाच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीत आमदार दिलीप मोहिते पाटील अडकले त्यांनी सुरक्षारक्षकासह रस्त्यावर उतरवून रस्त्यावरची कोंडी सोडविण्यास सुरुवात केली.
शहरातून जाणाऱ्या शिरूर-राजगुरूनगर- वाडा -भीमाशंकर हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. मात्र या महामार्गावर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. नागरिक रस्त्यावर पार्किंग करीत आहेत. नागरपरिषद व पोलीस यंत्रणा व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. तर रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत.
शहरात इंग्लिश मेडियमची शाळा सुटल्याने व कंपनी बसेस, शाळेच्या बसेस इतर जड अवजड वाहने, एसटी बसेस आणि दुचाकीची गर्दी झाल्याने चारही बाजूने रस्ते जॅम झाले. याचवेळी आमदार मोहिते पाटील हे एका कार्यक्रमाला खेडमध्ये येत होते. यादरम्यान त्यांनी शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर उतरले. त्याच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक, स्वीय सहायक सतीश कदम, दूध संघाचे संचालक अरुण चांभारे आदी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडवली.




