वडगाव मावळ :- सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी तालुक्यातील गृहनिर्माण संस्था,कृषी विकास संस्था,विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणत बेकायदेशीर निर्णय घेतल्याचे आरोप भाजपने केले होते. तसेच या सर्व निर्णयांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची भाजपने मागणी करून देखील सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्याने गुरुवारी (दि.१५) भाजपा शिवसेना आर.पी.आय.(A) महायुतीच्या वतीने सहाय्यक निबंधक कार्यालयावर टाळाठोक आंदोलन करून या भ्रष्ट अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, रीपाई चे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,माजी सभापती ज्ञानेश्वरजी दळवी यांनी विठ्ठल सुर्यवंशी यांनी केलेल्या बेकायदेशीर निर्णयाचा पाढा जनतेसमोर मांडून त्यांच्या भ्रष्ट कारभाराचा भांडाफोड करून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यास पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.
माजी सभापती गुलाब म्हाळसकर, रिपाई तालुकाध्यक्ष नारायणजी भालेराव,माजी उपसभापती शांताराम कदम, सरचिटणीस बाळासाहेब जाधव, शहराध्यक्ष अनंता कुडे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,महिला आघाडी अध्यक्षा सायली ताई बोत्रे, गणेश धानिवले, डॉ.बाळासाहेब पलांडे,शत्रुघ्न भाऊ धनवे,ज्ञानेश्वर भाऊ आडकर ई पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुर्यवंशी यांनी त्या-त्या गावातील सोसायटी मध्ये घेतलेल्या बेकायदेशीर निर्णयाची माहिती देत अशा भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन करून तालुक्यातून हकलपट्टी करण्याची मागणी केली.
यावेळी आंदोलकांशी उपनिबंधक .बाळासाहेब तावरे यांनी चर्चा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विठ्ठल सुर्यवंशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय केला असल्याचे सांगून त्यांची लवकरात लवकर सखोल उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई केली जाईल व उद्या पासून ते या कार्यालयात दिसणार नाहीत असे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे घोषित करण्यात आले.




