मुंबई : देशातील सर्व बँकांनी परस्परांमध्ये ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे बँकांना ग्राहकांना कार्यक्षम आणि दर्जेदार सेवा देता येऊ शकतील, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना सुचविले आहे. बँकांनी संघटना असलेल्या इंडियन बँक असोसिएशन या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सीतारामन यांनी सांगितले की, काही ग्राहकांना विविध बँकांबरोबर समांतर व्यवहार करावे लागतात.
अशा परिस्थितीमध्ये जर बँकांमध्ये समन्वय नसेल तर ग्राहकाची कुचंबना होते. स्पर्धा किंवा इतर कारणामुळे बँकांनी जर इतर बँकांबरोबर समन्वय साधला नाही तर त्यामुळे ग्राहकांबरोबरच बँकिंग क्षेत्राचे नुकसान होण्याचा धोका निर्माण होतो. असे अर्थमंत्री यांनी सांगितले.
ग्राहकांची एकूण परिस्थिती पाहता बँकांनी जर स्थानिक भाषांमध्ये व्यवहार करण्यास प्राधान्य दिले तर त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना अधिक चांगले व्यवहार करता येतील. त्या दृष्टिकोनातून सर्व बँकांनी नेटाने प्रयत्न केल्यास ग्राहक आणि बँकां दरम्यान आपलेपणा वाढेल असे त्यांनी सांगितले.
बँकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. बँकांनी दहा वर्षांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्यामुळे बँकिंग सुविधा तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे बँकांची किंवा ग्राहकांची फसवणूक होणार नाही याकडे अधिक लक्ष द्यावे, असे त्या म्हणाल्या.
२०४७ मध्ये देश विकसित करण्याचा संकल्प देशाने सोडला आहे. अशा परिस्थितीत बँकांचे देशातील आणि परदेशातील व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून बँकांनी आपल्या पायाभूत सुविधा विस्तारीत कराव्यात असे त्यानी यावेळी बोलताना सांगितले.



