लोणावळा – श्री आई एकवीरा देवीच्या नवरात्रोत्सवाची सुरवात आश्विन शु.प्रतिपदेला म्हणजेच २६ सप्टेंबर सोमवारी घटस्थापना करण्यात येणार असून महानवमीचा होम हा ४ आॕक्टोबर पहाटे होणार आहे अशी माहिती एकविरा देवस्थान कार्ला वेहरगाव प्रशासकीय समितीच्या वतिने दिली असून आज एकविरा मंदिरात तयारी सुरू होती.
कार्ला वेहरगाव गडावरील आई एकवीरा देवीच्या नऊ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सव कार्यक्रमांला सुरवात घटस्थापनेच्या दिवशी सकाळी सकाळी सात ते आठ या वेळेत आई एकवीरा व आई जोगेश्वरी देवीची विधिविहत पूजा करून घटस्थापना करण्यात येणार आहे.
आश्विन शु.अष्टमीला “दुर्गाष्टमीचे उपवास” असून सर्वात महत्वाचा “होम हवन” विधी रात्री अकरा वाजता सुरू होणार असून पूर्णाहुती पहाटे पाच वाजता करून उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. दरम्यान या नऊ दिवसांच्या काळात गडावर रोज पहाटे “दुर्गा सप्तशती”चे पठण करण्यात येणार आहे,
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता योग्य नियोजन करण्यात आले असून भाविकांना सर्व सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक मंगेश गायकवाड यांनी दिली. तसेच आई एकविरादेवी मंदिर भक्तांना दर्शवण्यासाठी सज्ज झाले असून मंदिराची रंगरंगोटी,विद्युत रोषणाई तसेच भाविकांच्या दर्शन रांगेवरती मंडप तथा पुष्प सजावट करण्यात आली आहे.
पोलिसप्रशासना कडून जागोजागी पोलीस कर्मचारी तसेच मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे . दर्शन रांगांची साफसफाई व स्वच्छता करण्यात आली असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे . भारतीय पुरातत्त्व विभागाने गडावर बांधलेले स्वच्छतागृह मागील काही महिन्यांपासून बंद आहे . ते भाविकांसाठी खुले करावे अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली आहे . गडावर तयारी पुर्ण झाली असली तरी पायऱ्या दुरुस्ती व स्वच्छता ही कामे काहीशी अपुर्ण आहेत . प्रशासनाने याकरिता पुढाकार घ्यावा तसेच पुरातत्त्व विभागाने दुरुस्ती कामे करून घेणे गरजेचे आहे . भाविकांनी गडावर येताना तसेच खाली उतरताना फार गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच नियमांचे पालन करावे. मंदिर प्रशासनाला सहकार्य करत शांततामय वातावरणात दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन एकविरादेवी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




