पिंपरी (प्रतिनिधी) काटे – वस्ती, पुनावळे येथे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी ओव्हर फ्लो होत आहे. रस्त्याची दुरवस्था झाली असून पथदिवेही बंद आहेत. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ‘जो देणार नागरी समस्यांकडे लक्ष, तोच आमचा पक्ष’ असे नागरिक म्हणू लागले आहेत. सोशल मीडियावर सध्या नागरिकांनी याबाबत जणू काही मोहीमच सुरू केली आहे.
पिंपरी चिंचवड मार्च महिन्यांत महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपुष्टात आली. यामुळे प्रशासकीय राजवट सुरू झाली. यामुळे नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारी येथील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून काटेवस्ती, पुनावळे येथे नागरिकांना समस्या भेडसावत आहेत. त्यामध्ये ड्रेनेज ओव्हर फ्लो होत असून त्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे.
पावसाच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने रस्त्यावर पाणी साचत आहे. तसेच ड्रेनेजच्या पाण्याला येणारी दुर्गंधी आसपासच्या परिसरात पसरत आहे. या ड्रेनेजच्या पाण्यातून जाताना दुचाकी वाहन चालक आणि पादचारी यांची मोठी अडचण होते. पावसामुळे रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.




