वाकड : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार पिंपरी चिंचवड शहरातील हाऊसिंग सोसायटी रहिवाशांशी थेट संवाद साधणार आहेत. उद्या दसऱ्या दिवशी (ता. ५) थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयात सकाळी ८ वाजता या संवाद सोहळ्याला सुरुवात होईल.
पिंपरी-चिंचवड शहरातील फ्लॅट व सोसायटी धारकांच्या अनेक समस्या आहेत. पैसे देऊन बिल्डरकडून झालेली फसवणूक, महापालिकेच्या संदर्भातील अडचणी, सहकार विभागातील समस्या, खंडित वीजपुरवठा अशा अनेक अडचणींच्या विळख्यात सोसायटी धारक अडकले आहेत. या समस्या अनेकांच्या चिंतेच्या विषय बनल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शहरातील सोसायटी धारकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, कार्यक्रमापूर्वी ठिकठिकाणच्या सोसायटीतील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे अडचणीचे निवेदन देण्यास सुरुवात केली आहे. या सर्व तक्रारी अजित पवार यांच्यापुढे सादर केल्या जाणार आहेत. ऐनवेळी आलेल्या तक्रारींचे समाधान करण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या तयारीबाबत माजी नगरसेविका माया संतोष बारणे म्हणाल्या की, ‘संवाद सोसायटी धारकांशी’ या उपक्रमास सोसायटी धारकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वर्षानुवर्षे सोसायटी धारकांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोसायटी धारकांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अजित पवार यांनी लक्ष घातल्याने समस्या मार्गी लागतील, या तक्रारींची दखल संबंधित प्रशासनाला घ्यावीच लागेल.




