मुंबई ; तृणमूल काँग्रेसशी – असलेली जवळीक बाजूला ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा प्रस्ताव सौरव गांगुलीने फेटाळल्यामुळेच त्याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती होणार नसल्याचे समोर येत आहे. याबाबत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही याच स्वरूपाचे आरोप भाजपवर केले आहेत. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या बोलण्यास बीसीसीआयच्या एकही सदस्याने होकार दिला नाही.
केवळ २४ तासांत बीसीसीआयमधील निवडणुकीचे चित्र पालटले असून गांगुलीला बीसीसीआयमधून बाहेर पडावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईत दाखल झाल्यावर गांगुलीने पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कायम राहण्याची इच्छा दर्शवली होती मात्र, एखाद दोन राज्यांचे प्रतिनिधी वगळता अन्य राज्यांच्या प्रतिनिधिंनी गांगुलीच्या नावाला विरोध केल्याचेही समोर येत आहे. गांगुली गेली तीन वर्षे अध्यक्षपदी होते.




