Mohammed Shami On Retirement: भारतीय संघातील डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. त्याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत शेवटची संधी दिली गेली होती. त्यानंतर इंग्लंड आणि आशिया चषकासाठी त्याला संघात स्थान देण्यासाठी विचार सुद्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे मोहम्मद शमी निवृत्तीचा निर्णय घेणार का? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. दरम्यान या प्रश्नाचं उत्तर देताना मोहम्मद शमी संताप व्यक्त करताना दिसून आला आहे.

न्यूज २४ ला दिलेल्या मुलाखतीत शमीने निवृत्तीच्या प्रश्नावर संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला,”जर कोणाला काही समस्या असेल तर मला थेट सांगा. माझ्या निवृत्तीमुळे त्यांच्या आयुष्यात काही सुधारणा होत असतील, तर तेही स्पष्ट करा. मी कुणाच्या आयुष्यात अडथळा ठरलो आहे का, की मला निवृत्त व्हावं अशी अपेक्षा ठेवली जाते? ज्या दिवशी मला खेळाचा कंटाळा येईल, त्या दिवशी मी स्वतःहून निवृत्ती घेईन. तुम्ही मला संघात घेत नाही, तरीही मी मेहनत थांबवणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी नसेल, तर मी देशांतर्गत क्रिकेट खेळत राहीन. कुठे ना कुठे मी खेळतच राहणार. निवृत्तीचा निर्णय तुम्ही नाही, तर मीच घेईन आणि तोही तेव्हाच, जेव्हा मला खरंच कंटाळा येईल. पण ती वेळ अजून आलेली नाही.”

मोहम्मद शमीने आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तो या स्पर्धेतील सर्वात कमी सामने खेळून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता. मात्र, या स्पर्धेनंतर दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं. दुखापतग्रस्त असूनही त्याने भारतीय संघासाठी पूर्ण जोर लावला होता.