पिंपरी : देहू-आळंदी BRT रस्ता पावसामुळे आणि पाणी पुरवठा जलवाहिनीच्या कामामुळे पूर्ण खराब झाला आहे. हा रस्ता देहू व आळंदी या दोन तिर्थक्षेत्रांना जोडणारा शहरातील एकमेव रस्ता आहे. तसेच तळवडे आयटी पार्क व चाकण एमआयडीसीकडे जाणारी मोठी वाहतूक याच रस्त्याने होत असते. त्यामुळे या रस्त्यांचे दुरुस्ती महापालिकेने तातडीने करावी अशी मागणी मा. नगरसेवक पंकज भालेकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

देहू आळंदी बीआरटी रस्त्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आंध्र धरणातून पाणीपुरवठा आणण्यासाठी १२०० मीमी व्यासाची जलवाहीनी रस्त्याच्या मध्यभागी टाकण्यात आली. त्यातच परतीच्या पावसामुळे रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. तात्पुरती डागडुजी केली असली तरीही रस्ता अद्याप पूर्ववत झालेला नाही. त्यातच रस्त्यावर केबल टाकण्याकरीता रस्त्याची खोदाई करणेत आली असल्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. त्यामुळे देहू आळंदी रस्त्याची वाहतुक संथ झाली असुन अपघातांचे प्रमाणात वाढलेली आहे.
त्यामुळे स्थानिक नागरिक, कामगार वर्गाना खड्डेमय रस्त्याने प्रवास करताना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी पिंपरी चिंचवड मनपाच्या BRT व पाणीपुरवठा विभागाकडे यासाठी वारंवार पाठपुरावा करणेत आला आहे. मात्र दोन्ही विभागांकडून टाळाटाळ होत असल्याचे दिसुन आली आहे.
निगडी तळवडे रस्त्याची गणेशनगर चौक व कहारमाथा (मोनोपोल जवळ) येथे रस्त्याची दुरावस्था झाली असुन बीआरटी रस्त्यासोबत तात्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे. याबाबत मनपामार्फत तात्काळ कार्यवाही करून दोन्ही रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणेत यावी, अन्यथा याकरीता नागरीकांच्या तीव्र आंदोलन करणेत येईल. तरी याबाबत मनपा प्रशासनामार्फत उचित कार्यवाही करणेत यावी असे पंकज भालेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.




