पिंपरी, दि. 10 (प्रतिनिधी) – जन्मदिनी शहरातील गुन्हेगारांना एकत्रित करून दहशत पसरवणे हे उद्योगनगरी मधील सराईत गुन्हेगार शाहरुख खानच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलिसांनी त्याच्यासह चौघांची उचलबांगडी करत गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
शाहरुख युनूस खान (वय २९, रा. काळाखडक, वाकड), सोन्या उर्फ आशिष विजय गोयर (वय २९, रा. थेरगाव), दीपक बाळू धोत्रे (वय २४, रा. निगडी) आणि कुलदीप श्रीनिवास बिराजदार (वय २४, रा. रहाटणी) अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान, सोमवारी दि. ७ नोव्हेंबर रोजी त्याने रात्री काळाखडक येथे वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे फोटो, रिल्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. दरम्यान, गुंडा विरोधी पथकाने याबाबत माहिती घेतली असता शाहरुख खान याला वाकड पोलिसांनी नोटीस देऊन कार्यक्रम घेण्यास मनाई केली होती. मात्र, तरी देखील त्याने वाकड पोलिसांच्या नाकावर टिच्चून जंगी कार्यक्रम घेतल्याचे समोर आले.
या कार्यक्रमाला शहरातील गुन्हेगारांनी मोठ्या संख्यने हजेरी लावली होती. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर गुंडा स्कॉडने शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या आलेल्या गुन्हेगारांची माहिती संकलित केली आहे. गुरुवारी (दि. १०) चौघांची उचलबांगडी करून त्यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.




