पिंपरी: पिंपरी-चिंचवडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान सय्यद यांनी “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. इरफान सय्यद यांनी ठाण्यातील टेंभी नाका परिसरात आनंदाश्रम येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे.
त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठी हानी होणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा बडा कामगार नेता एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून इरफान सय्यद यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
यापूर्वी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता त्यांच्या पाठोपाठ पुणे जिल्ह्यात असंघटित कामगारांचे मोठे नेटवर्क, तरुणांमध्ये क्रेझ असलेले कामगार नेते इरफान सय्यद यांनीही बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
सय्यद हे असंघटित कामगारांचे पिंपरी चिंचवड, चाकण तळेगाव औद्योगिक एमआयडीसी भागातील कामगारात प्रसिद्ध असणारे नेते आहेत. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे कामगारांचे मोठे जाळे आहे. त्यांनी मोठा कामगार वर्ग जोडून ठेवला आहे. उत्तम संघटन कौशल्याच्या जोरावर कार्यकर्ते, कामगार वर्गाची मोठी फळी त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.



