पिंपरी (प्रतिनिधी) राज्यात छत्रपती – शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आदीसह अनेक महापुरुषांवर चुकीची वक्तव्ये केली जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी ८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देत असल्याचे बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना एकवटल्या असून ८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.
बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मनसेचे अध्यक्ष सचिन चिखले, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, राहुल कलाटे, काशिनाथ नखाते, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष इम्रान शेख, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारूती भापकर, अभिमन्यू पवार, सतिश काळे, धम्मराज साळवे आदीसह सर्व पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.




