पिंपरी : महाराष्ट्रात सध्या महापुरुषांचा अपमान करण्याचे सत्र सुरू आहे. यात राज्यपाल तर राज्यातील जबाबदार मंत्री देखील प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. यातून महाराष्ट्रात रोष वाढत असून, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पिंपरी चिंचवड शहरात घडलेली शाईफेकीची घटना याचेच प्रत्यंतर देणारी होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली.
महाराष्ट्रातील महापुरुषांचा होणारा सातत्यपूर्ण अपमान थांबला पाहिजे आणि महाराष्ट्रात असलेल्या शांततापूर्ण वातावरण अबाधित राहावे, इथल्या सामजिक सद्भावनेला धक्का लागू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्रियपणे काम करत असतो. यातूनच आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब पिंपरी चिंचवड शहरात आलेले असताना त्यांची शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेतली.
यावेळेस जयंत पाटील यांनी देखील या विषयात आपण सामंजस्यपूर्ण मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांची देखील भेट यावेळेस घेऊन त्यांनाही या प्रकरणी निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, मारुती भापकर, तर मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, वंचित आघाडीचे देवेंद्र तायडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.




