लोणावळा : लोणावळा शहरात स्विमिंगपूल मध्ये बुडून मृत्यू होण्याची अजून एक दुर्दैवी घटना घडली आहे. निखिल संपत निकम (रा. थेरगाव, चिंचवड) या 22 वर्षीय युवकाचा स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे स्विमिंगपूलची सुरक्षा आणि हे पूल अधिकृत की अनधिकृत हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन या स्विमिंग पूल प्रश्नावर नक्की काय निर्णय घेत आहे, काय कारवाई करीत आहे याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात साशंकता निर्माण होऊ लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विशाल नानासाहेब निकम (वय 32, शिवराम हाईट, विष्णुदेव नगर, पुनावळे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. लोणावळ्यातील जुना खंडाळा भागातील अशोक निर्वान सोसायटीमधील पाम ग्रो या खाजगी बंगल्यात मंगळवारी निखिल हा अजिंक्य टकले, सत्यजित काळभोर, शुभम लांडे, रत्नसिंह कुलकर्णी, प्रतिक खोसे व त्याच्या इतर काही मित्रांसोबत रत्नसिंह कुलकर्णी याचा जन्म दिवस साजरा करण्याकरिता आला होता.
त्यावेळी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास तो स्विमिंग पुल मध्ये पडला. त्यानंतर त्याला उपचारा करिता संजीवनी हॉस्पीटल, लोणावळा येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून तो उपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषीत केले. या घटनेची माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस उपनिरीक्षक मुजावर व पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पुढील तपास सुरू केला.




