- सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर महापालिकेला आली जाग
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथे देशातील सर्वाधिक 107 मीटर उंचीवर उभारलेल्या राष्ट्रध्वज मळला असून यामुळे ध्वजसंहितेनुसार ध्वजाचा अपमान होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली होती.अखेर महापालिका प्रशासनाकडून सदर राष्ट्रध्वज तात्काळ बदलत त्या ठिकाणी नवा राष्ट्रध्वज लावण्यात आला.
पिंपरी पालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात सुमारे 107 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक उंची असलेला दोन नंबरचा हा ध्वज आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रध्वज मळल्यामुळे ध्वजसंहितेनुसार ध्वजाचा अपमान होत असल्याचे दिपक खैरनार यांच्या निदर्शनास आले.त्यानंतर त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर राष्ट्रध्वज बदलण्यात आला.परंतू भारताच्या अस्मितेचा व सन्मानाचा विषय असणाऱ्या भारतीय राष्ट्रध्वजा संदर्भात महापालिका प्रशासनातील अधिकारी व भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यानात कार्यरत असणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षकांना याचे गांभीर्य नाही का? अनेकवेळा राष्ट्रध्वज फाटतो, राष्ट्रध्वजाची शिलाई निघते.
परंतू तक्रार केल्यानंतरच त्यावर उशिराने कारवाई केली जाते. जर यांना मळलेला राष्ट्रध्वजही दिसत नसेल तर महापालिकेकडून राष्ट्रध्वजाच्या देखभालीसाठी करण्यात येणार्या खर्चाचे फलित साध्य होतेय का? असा सवाल खैरनार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे तक्रारीची दखल घेऊन यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिपक खैरनार यांनी केली आहे.




