पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर भाजपकडून त्यांच्या पत्नी अथवा तेज बंधू शंकर जगताप यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. राज्यात दिवंगत आमदार किंवा खासदार यांच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, मागील काही वर्षात कोल्हापूर, नांदेड, पंढरपूर या विधानसभेत पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवार मैदानात उतरविला होता. त्याचीच पुनरावृत्ती चिंचवड विधानसभेतील पोटनिवडणुकीमध्ये विरोधकाकडून होणार याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाले आहे.
पिंपरी चिंचवड शहर पहिल्यांदाच विधानसभेची पोट पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीकडे महापालिकेची लिटमस टेस्ट म्हणून सर्वच पक्ष पाहणार आहे. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्षात असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इच्छुक समोर येऊ लागले आहेत. “राजा वही बनेगा जो काबिल होगा” असा नारा देत पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांचे जोरदार ब्रँडिंग त्याच्या कार्यकर्त्यांच्या कडून सोशल मीडियावरती सुरू झाले आहे. तर मागील निवडणुकीत लक्ष्मण जगताप व राहुल कलाटे यांच्या दुरंगी लढत झाली. पोट निवडणुकीत नाना काटे यांनी दंड थोपटल्यामुळे ही लढत तिरंगी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
27 फेब्रुवारी रोजी मतदान व दोन मार्च रोजी मतमोजणी होऊन चिंचवड विधानसभेला नवीन आमदार मिळणार आहे मात्र नवीन आमदार हा पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड की वाकड अथवा अन्य कोणत्या भागातून मिळेल हे आपणाला दोन मार्च रोजी समजणार आहे. नगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक चिंचवड विधानसभेत निवडून येतात. त्यामुळे पोटनिवडणुकीतून राष्ट्रवादीला पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्यासाठी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार मैदानात देतील अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला पुनरागमन करण्यासाठी पक्षाने चिंचवड विधानसभेची निवडणूक बिनविरोध करणे पक्षासाठी परवडणारे नाही. त्यामुळे ही निवडणूक लढवण्यासाठी अजित पवार यांच्याकडे पक्षातील नगरसेवक पदाधिकारी मागणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपने पंढरपूरची जागा पोटनिवडणुकीतून हिसकावून घेतली आहे त्याची भरपाई करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसला चिंचवड विधानसभेतून मिळणार आहे. राज्यातील राजकारणाची गणिते बदलल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यातच शिवसेनेतील काही इच्छुक कोणत्या पक्षाकडून लढणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची निष्ठावान राहणाऱ्या नाना काटे यांना पुन्हा एकदा विधानसभा लढवण्याची ताकद पक्षाने द्यावी, अशी मागणी विधानसभेतील कार्यकर्त्याकडून होताना दिसत आहे.




