पिंपरी ; मतदान केंद्रामधील सुविधा, मतदान केंद्राचे साहित्य वाटप, मतदार संघातील संवेदनशील आणि असुरक्षित मतदान केंद्रांची निश्चिती तसेच तेथील सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन, मागील निवडणूकीच्या कालावधीतील नोंदविलेल्या गुन्ह्यांची माहिती घेणे, संवेदनशील मतदार संघांचा आढावा घेऊन योग्य त्या उपाययोजना करणे, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सचिन ढोले यांनी बैठकीत संबंधिताना विविध सूचना केल्या. मतदान केंद्र, मतदार संख्या यादृष्टीने इतर मतदार संघाच्या तुलनेत चिंचवड मतदारसंघ सर्वात मोठा आहे. त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. यासाठी सर्व बाबींचा विचार करून नियोजन केले जात आहे. पोलीस प्रशासनाने निवडणूक कामकाजासाठी आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करावा, आदी सूचनाही ढोले यांनी यावेळी केल्या.
पोलीस प्रशासन व निवडणूक विभाग यांनी आपसात समन्वय ठेवून निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार निवडणूक कामकाज यशस्वीरित्या पार पाडावे असेही ते म्हणाले. निवडणूक प्रक्रिया शांततेने आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन केले असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी यावेळी सांगितले. निवडणूक कामकाजासाठी पोलीस प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील, असे डिसले म्हणाले.



